एक होता लक्ष्मण!
- दीपक वानखेडे.
गजलकार लक्ष्मण जेवणे!
गजलरसिकांकरिता एक हृदयाजवळचे नाव आहे. एक वर्षांपूर्वी गजलरसिक आणि गजलकार मित्रांचा मोठा परिवार सोडून लक्ष्मण हे जग सोडून गेला. लक्ष्मण गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाप्रति आपलं एक कर्तव्य म्हणून गजलनवाज भीमरावदादा पांचाळे यांनी घेतलेल्या पुढाकार आणि आवाहनाला सार्या गजलकार मित्रांनी लक्ष्मणच्या कुटुंबाप्रति एक मदतनिधी गोळा केला. लक्ष्मणच्या पहिल्या स्मृतिदिनी 21 डिसेंबर रोजी अमरावतीला आयोजित कार्यक्रमात हा निधी लक्ष्मणच्या कुटुंबाला हा निधी सुपूर्द करण्यात येणार आहे. यानिमित्त लक्ष्मणच्या गजलप्रवासावर प्रकाश टाकणारा मी लिहिलेला हा लेख आजच्या ‘तरुण भारत’च्या ‘तभा कट्टा’ या फिचर पेजवर ‘वेगळी गोष्ट’ या सदरात आज (19 डिसेंबर)प्रकाशित झाला.
मराठी ग़जल रसिकांना ग़जलकार लक्ष्मण जेवणे हे नाव जवळून माहिती आहे. मागील वर्षी 20 डिसेंबर रोजी लक्ष्मण सर्वांचा निरोप घेऊन काळाच्या पडद्याआड गेला. मराठी ग़जल आणि मराठी ग़जलेचे रसिक त्याला सहजासहजी विसरू शकणार नाहीत.
मराठी ग़जल सारखी बहरत राहावी, ती जास्तीत जास्त लोकांना कळावी, या उदात्त हेतूनं ग़जलनवाज भीमराव पांचाळे यांनी स्थापन केलेल्या ग़जल सागर प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रभर आणि देशाच्या विविध कानाकोपर्यात, नव्हे परेदशातही ग़जलनवाजांच्या मार्गदर्शनात आयोजित ग़जलेच्या कार्यशाळेत लक्ष्मणचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहायचा. ग़जलेचे वृत्त िंकवा ती लिहावी कशी, यावर तो कार्यशाळेत समजावून सांगायचा. ग़जलेप्रति अतोनात प्रेम असणार्या लक्ष्मणने लिहिलंय्, की-
‘चार गजला, चार खांदे फार आहे
हेच माझ्या जीवनाचे सार आहे....’
जीवनाचं खरं सार कशात आहे, याची जाणीव असलेल्या लक्ष्मणचं बालपणही तसं कष्टातच गेलं. मोठ्या हिमतीने आणि जिकरीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लक्ष्मणनं त्याचं शिक्षण पूर्ण केलं. बीएड झाल्यानंतर नेर िंपगळाई येथील शाळेत एक मोठे स्वप्न पाहत तुटपुंज्या पगाराची नोकरी पत्करली. शिक्षणादरम्यानच ग़जल ही त्याच्या आयुष्यात आली होती. बरोबरीचे मित्र आणि आजचे ग़जलकार प्रफुल्ल भुजाडे, प्रमोद चोबितकर त्याच्याच गावचे होत. ग़जलनवाज भीमराव पांचाळे यांच्यामुळे या मित्रांना एक मोठं व्यासपीठ मिळाल्यानंतर लक्ष्मणकरिता ग़जलच सर्वकाही झाली.
असं म्हणतात, की- कलाकार हा कधीही समाधानी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मणमधला कलाकारही समाधानी नव्हता. ग़जलेेसोबत कलेच्या दुसर्या प्रांतातही तो शिरला. ‘कैवल्याचा महामेरू’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानी केलं आहे. ग़जलेनंतर कलेच्या एका नव्या प्रांतात त्याची यशस्वी सुरुवात झालीच होती, की- नियतीनं डाव साधला आणि लक्ष्मण निघून गेला.

‘इतकीच एक इच्छा उरली मनात आता
आलो जरी रडत मी जाईन गात आता...
जन्मासवेच माझ्या मागावरी शिकारी
ही कस्तुरीच माझा करणार घात आता.....’
असं लिहून ठेवणारा लक्ष्मण आताही ग़जल रसिकांना सतत आठवत राहतो.
लक्ष्मणच्या या आयुष्याच्या प्रवासात त्याच्यासोबत जिव्हाळ्याची ग़जल होती, तसाच मोठा मित्र परिवार होता. आजवर त्यानं केलेली ही त्याची सर्वांत मोठी कमाई. लक्ष्मण निघून गेल्यानंतर म्हणून त्याच्या सर्व मित्र परिवाराचा जीव हळहळला. आयुष्याचं कटुसत्य आणि आपल्या अवतीभवतीचं वास्तव...
‘निराळीच अशी माझी वाट आहे
व्यथा वेदना दु:ख घनदाट आहे
भुकेने गेला असावा बळी हा
पुढे पाहतो मी रिते ताट आहे....’
ज्यानं ताकदीच्या शब्दांतून रेखाटलं आहे, अशा सामाजिक बांधिलकीचा, समाजातील सूक्ष्म बारकावे टिपणारा कवी मनाचा लक्ष्मण निघून गेल्यानं ग़जलेचा सच्चा कार्यकर्त्या हरवला. त्यापेक्षा मोठं दु:ख म्हणजे- त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारावर मोठं संकट ओढवलं. त्या परिवाराकरिता एक अल्पसा मदतीचा हात म्हणून गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व मित्रांनी मिळून एक मोठी राशी गोळा केली.
लक्ष्मणच्या पहिल्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ 21 डिसेंबर रोजी अमरावतीला आयोजित या कार्यक्रमातून ही राशी त्याच्या परिवाराच्या सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी लक्ष्मणच्या ग़जलांचे गायनपण होणार आहे.
‘माझ्या घरी सुखाचा जेव्हा जमाव झाला
नेमका घराचा माझ्या लिलाव झाला....’
या अशा ग़जलरचना आणि लक्ष्मण मराठी ग़जल रसिकांपासून कधीच दूर जाणार नाही.
दीपक वानखेडे
9766486542
